मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन तत्काळ सुरु करण्याचे आदेश दिले.
महामार्गाच्या उभारणीसह रस्त्यांचे जाळे उत्कृष्ट आणि अधिक व्यापक करण्यासाठी नियोजन करावे.
राज्यातील महामार्गांचे जाळे उत्कृष्ट आणि अधिक व्यापक बनवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य नियोजन करावे. राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन व्यवसायाला चालना देणारा शक्तीपीठ महामार्ग दर्जेदार व जलद गतीने तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील आमणेतपर्यंत 76 कि.मी. काम वेगाने पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत तो पूर्णपणे सुरू करावा. तसेच या वर्षी समृद्धी महामार्गाच्या कर्ज रोखे प्रक्रियाही पूर्ण करावी. प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 13.30 कि.मी. मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करावे.
त्याचबरोबर नाशिक-मुंबई या प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणा तातडीने पूर्ण कराव्यात. मंत्रालयाच्या परिसरात नवीन सात मजली इमारतीचे काम पुढील शंभर दिवसांत सुरू करण्याचा निर्देशही त्यांनी दिला.
रस्त्यांच्या दुहेरी बाजूंना वृक्षारोपण करताना भविष्यातील रस्ता विस्ताराची गरज लक्षात ठेवा.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांनी प्रभावीपणे पार पाडावी. यासाठी नियंत्रण करणारी यंत्रणा विभागामार्फत कार्यान्वित करावी. विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारूप तयार करावे. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने पार पाडून बीओटी तत्वावर रस्त्यांचे काम करण्याचे धोरण स्वीकारावे. विविध विभागांच्या बांधकामांशी संबंधित केंद्रीय कार्यपद्धतीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी बांधकाम विभागामध्ये संबंधित कामांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला जाईल.
वृक्षारोपण करताना भविष्यातील रस्त्यांच्या विस्ताराची गरज लक्षात घेत वृक्षांचे संगोपन करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण आणि जलद कामे करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यावर भर: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, विभागामार्फत गुणवत्तापूर्ण व जलद गतीने कामे करण्यावर प्राधान्य दिले जाईल. विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवून ठरवलेली वेळमर्यादा काटेकोरपणे पाळली जाईल. महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा, विशेषतः महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल.
विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाची सविस्तर माहिती विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी दिली. कार्यक्षमता, गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विभागाच्या बळकटीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी दिली.